Friday, 19 October 2012

देशाला कलंक







           आसाममधील जातीय हिंसाचार हा देशाला कलंक असून अशा घटना पुन्हा घडू नयेत याची दक्षता घेणे गरजेचे आहे. वृत्तवाहिन्यांवर २00२ च्या गुजरात दंगलीचा विषय निघाला की, त्याला जोडून १९८४ च्या शीखविरोधी दंगलीचा मुद्दा पुढे सरकवला जातोच. तसे झाले नाही तर गुजरात दंगलीची चर्चा करणार्‍यावरच पूर्वग्रह दूषित असल्याचा आरोप केला जातो. हे आरोप-प्रत्यारोप होताना एक बाजू दुसर्‍या बाजूला जणू सुनावतच असते की, ‘‘बघा, आमच्या कार्यकाळात झालेल्या दंगलीत तुमच्या काळात झालेल्या दंगलीपेक्षा कमी माणसे मेली, म्हणजे दंगली हाताळण्याचे आमचे रेकॉर्ड तुमच्यापेक्षा चांगले आहे, तुम्ही काय आम्हाला दंगलीविषयी सांगता.!’’
दंगलीसारख्या भयावह आणि निंदाजनक हिंसाचाराचे हिशेब असे कायम तुलनात्मकदृष्ट्याच मांडले जातात.प्रत्यक्षात कुठल्याही दंगलीत बळी गेलेला सामान्य जीव म्हणजे देशाच्या प्रतिमेला लागलेला कलंकच; पण टेलिव्हिजन स्टुडिओतल्या कर्कश आरडाओरड्यात हे सत्यच दडपले जाते.
सध्या गुजरात आणि आसामच्या दंगलीचे असेच तुलनात्मक गणित मांडले जाते आहे. ‘‘ज्या हिरिरीने चोवीस तास रिपोर्टिंग करून मीडियाने गुजरात दंगल कव्हर केली, त्याचपद्धतीने आसामची दंगल का कव्हर करण्यात आली नाही, का दिसला नाही आसाममधला हिंसाचार टीव्हीवर लाइव्ह.?’’ असाअनेक व्यासपीठांवर उपस्थित केला जातो आहे. माध्यमांनी आसाम दंगल चोवीस तास थेट रिपोर्टिंग करत, वास्तव दाखवत कव्हर केली नाही कारण आसामात बोडोत्या दंगलीत भरडले जात होते; पण हीच माध्यमे गुजरात दंगल दाखवण्यात आघाडीवर होती, कारण गुजरात दंगलीत मुस्लीम मारले जात होते.
पण या युक्तिवादापेक्षा सत्यवेगळेच आहे आणि ते अधिक कोरडे वास्तव आहे. दंगलीने पेटलेली कोक्राझार ही आसामची राजधानी गुवाहाटीपासून किमान १५0 किलोमीटर दूर आहे. कोक्राझार तर जाऊच द्या; पण गुवाहाटीतही कुठल्याच नॅशनल चॅनलची ओबी व्हॅन नाही. ती नाही त्यामुळे लाइव्ह कनेक्टिव्हीटी नाही. आसामातल्या हिंसाचाराची माहिती कळून प्रत्येक चॅनलचे रिपोर्टर दंगलग्रस्त भागात पोहचेपोहचेपर्यंत बर्‍याच ठिकाणची दंगल आटोक्यात आलेली होती. ही दंगल एकतर्फी मुळीच नव्हती. बोडो, बंगाली हिंदू, आदिवासी आणि मुस्लीम असे सगळेच या दंगलीत भरडले गेले. या भागात राहणार्‍या विविध धर्मीय समाजातल्या सगळ्यांसाठीच ही दंगल जीवघेणी ठरली. तरीही अधिकृत आकडेवारी पाहिली तर आज निर्वासितांच्या छावण्यात इतर कुठल्याही धर्माच्या लोकांपेक्षा दंगलीत होरपळलेल्या मुस्लीम लोकांची संख्या अधिक आहे. मात्र, आज माध्यमातला कल्लोळ पाहिला तर असे चित्र रंगवले जाते आहे की, या दंगलीत एकाच समुदायाच्या माणसांचा बळी गेला. प्रत्यक्षात परिस्थिती तशी नाही. बोडोंना आपली जमीन गमवावी लागली हे जसे खरे आहे तशीच मुस्लिमांनाही त्यांची जमीन गमवावी लागली आहे; पण कुणातरी एकावरच ठपका ठेवण्याचा लोकप्रिय काल्पनिक कार्यक्रम या दंगलीतही राबवला जात आहे.

No comments:

Post a Comment