Tuesday, 15 October 2013

आधुनिक माध्यमे आणि चिंतनशीलतेचा अभाव



वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांची केवळ विश्वासार्हता कमी झाली इतकेच नाही तर 'कॉर्पोरेट' क्षेत्राच्या शिरकावामुळे शहरी भागातील कामगार वर्ग (संघटित वा असंघटित) आणि ग्रामीण भागातील दलित-पीडित मुस्लीम आदी घटक हा माध्यमांच्या दायऱ्यातून पूर्णत: हद्दपार झाला. वास्तविक, नव्वदच्या दशकापासून याच घटकांच्या समस्या तीव्रतम झाल्या. परंतु ते बातम्यांचे 'फोकस' ठरत नाहीत. एकंदरीत ही माध्यमे पूर्णत: नवमध्यमवर्ग नवश्रीमंत वर्गालाच 'ग्राहक' समजत असल्याने उपरोक्त घटकांचे जणू काही अस्तित्वच नष्ट झालेय की काय, असे या माध्यमांकडे पाहून वाटावे! अशा परिस्थितीत आता या नव्या काळात पर्यायी माध्यमे कोणती असू शकतात, हा प्रश्न कळीचा ठरतो. परंतु, आज तरी या प्रश्नाचे उत्तर सापडणे कठीण आहे. अनेकजण या बाबतीत 'इंटरनेट', 'सोशल नेटवर्किंग' या इलेक्ट्रॉनिक नवमाध्यमांकडे निर्देश करतात. तसे करताना टयुनिशिया, इजिप्त आदी देशांतील अरब स्प्रिंग दरम्यान झालेल्या सोशल नेटवर्किंगच्या परिणामकारक वापराचे उदाहरण देतात. याबाबतीत, बरेचजण (विशेष करून युवा वर्गातील) माझ्याशी सहमत होणार नाहीत, परंतु या संदर्भात आवर्जून सांगावेसे वाटते की, एखादा 'इश्यू तापवण्यापुरता' या माध्यमाचा जरूर उपयोग होऊ शकतो. परंतु, यात जो काही संवाद होतो, तो खूपच वरवरचा आणि उथळ असतो. याद्वारे एखाद्या समस्येबाबतच्या विविध पैलूंबाबत प्रबोधन करणे वा होणे केवळ अशक्य वाटते. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे 'गती' हा या माध्यमामागचा मूलमंत्र आहे. झटपट 'टाईप' करून 'यस्', 'नो', 'सबस्क्राईब', 'सबमिट' या बटणांद्वारे झटपट सहमती साध्य होऊ शकते, परंतु सखोल संवाद साध्य होऊ शकत नाही. त्यामुळेच, याद्वारे वरवरचे मतप्रदर्शन वा भ्रामक मतैक्य होऊ शकते, परंतु त्याला कुठल्याही मतप्रणालीचा वा सैध्दांतिक आधार लाभणे कठीण.याचे दुसरे मूलभूत कारण असे की, आजची मुद्रित वा इलेक्ट्रॉनिक माध्यमे वा सोशल नेटवर्किंगची माध्यमे ही वाचकाला, पाहणाऱ्याला सहभागी होणाऱ्याला एखाद्या विषयाची सर्वांगीण माहिती देऊन चिंतनशीलतेला वाव देणे आवश्यक समजत नाहीत. माहितीचा वा मतांचा मारा इतक्या वेगाने होतो की, त्याचा ऐकणाऱ्याच्या वा वाचणाऱ्याच्या मनावर अत्यंत तात्पुरता परिणाम होतो. तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट ही की, विविध विषयासंबंधीची वा समस्यांसंबंधीच्या माहितीचा परस्पर संबंध दर्शवून देण्याची कोणतीही योजना वा व्यवस्था या तिन्ही माध्यमांमध्ये दिसून येत नाही.


No comments:

Post a Comment