Tuesday, 15 October 2013

इंटरनेट व सोशल मिडीया



आज जगात माहितीचा स्फोट झाला आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारचे ज्ञान मिळवणे सोपे झाले असून, माहीती ही ठराविक वर्गाची मक्तेदारी राहीली नाही, इंटरनेट व सोशल नेट वर्किंग माध्यमांचा वापर पर्यायी माध्यमम्हणून करून लोकांच्या प्रश्न एरणीवर आणणे ही  काळाची गरज ठरली आहे. आज इंटरनेट हा माहितीचा मायाजाल म्हणून समजले जाते प्रत्येक घटनेची इत्यंभूत माहिती हि या मायाजालातून मिळते आणि त्यामुळेच इतर माध्यमांपेक्षा हे वेब माध्यम अत्यंत प्रसिद्ध पावले आहे आ

णि त्यामुळे जग अत्यंत जवळ आले आहे. आज जगामध्ये सोशल मिडिया आणि सोशल नेट वर्किग या दोन शब्दांनी अक्षरशः वादळ निर्माण केले आहे. मात्र सावधान तुम्हाला जर वाटत असेल कि येणाऱ्या काळात सोशल मिडिया ला खूप महत्व प्राप्त होईल तर तुम्ही चुकत आहात कारण हि गोष्ट येउन उभी राहिली आहे एकतर तुम्ही त्यावर स्वार व्हा किव्हा त्याचा सामना करा  कारण जे बरोबर येतील त्यांना घेऊन सोशल मिडिया भरधाव वेगाने पुढे निघून जाईल आणि आपण तिथेच राहू आणि त्यामुळे आजच्या युगात या मिडिया च्या बरोबरीने काम करणे आणि त्याचा योग्य तो वापर करून विकास सध्य करणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र अस जरी  असल तरी आज मोठ्या प्रमाणावर इंटरनेट, फेसबुक, टवीटर, एसएमएस, कॅमेरा, व्हिडीओ, मल्टीमिडीया प्लेयर, इत्यादिचा वापर आज प्रामुख्याने होत आहे. या सर्वांमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे. तसेच चुकीचे व गैरप्रकार घडताना दिसून येत आहेत. या सुविधांचा समाजावर वाईट परिणामपडत आहे.फेसबुकसारख्या सुविधामुळे हिंसाचार, एखाद्याचा मानसिक छळ यासारखे प्रकार घडताना दिसत आहे. इंटरनेटसारख्या वेबसाईटवरून देशविघातक अफवांना सुरूवात झाली. यामुळे जातीय दंगली घडवण्याच्या अफवेखोरांचा डाव असू शकतो. व्हिडीओ सारख्या सुविधामुळे अश्लिल चित्रफित तयार करून इंटरनेटवर पाठवणे, यासारखे प्रकार घडताना दिसून येत आहेत. या अशा प्रकारामुळे स्त्रियांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.यामुळे या सुविधावर सरकारने बंदी घातली पाहिजे. भारतात इंटरनेटवर अंशत: स्वातंत्र्य असल्याचे म्हटले आहे. तरीही आक्षेपार्ह आणि अफवा पसविणार्‍या आणि देशाच्यासुरक्षिततेसाठी घातक वेबसाईटवर बंदी घालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याचाच अर्थ असा कि आज इंटरनेट वापरणे हि जरी  काळाची गरज असली तरी त्याचा गैरवापर होणार नाही याची खबरदारी घेणे हि अत्यंत गरजेचे आहे.

आधुनिक माध्यमे आणि चिंतनशीलतेचा अभाव



वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांची केवळ विश्वासार्हता कमी झाली इतकेच नाही तर 'कॉर्पोरेट' क्षेत्राच्या शिरकावामुळे शहरी भागातील कामगार वर्ग (संघटित वा असंघटित) आणि ग्रामीण भागातील दलित-पीडित मुस्लीम आदी घटक हा माध्यमांच्या दायऱ्यातून पूर्णत: हद्दपार झाला. वास्तविक, नव्वदच्या दशकापासून याच घटकांच्या समस्या तीव्रतम झाल्या. परंतु ते बातम्यांचे 'फोकस' ठरत नाहीत. एकंदरीत ही माध्यमे पूर्णत: नवमध्यमवर्ग नवश्रीमंत वर्गालाच 'ग्राहक' समजत असल्याने उपरोक्त घटकांचे जणू काही अस्तित्वच नष्ट झालेय की काय, असे या माध्यमांकडे पाहून वाटावे! अशा परिस्थितीत आता या नव्या काळात पर्यायी माध्यमे कोणती असू शकतात, हा प्रश्न कळीचा ठरतो. परंतु, आज तरी या प्रश्नाचे उत्तर सापडणे कठीण आहे. अनेकजण या बाबतीत 'इंटरनेट', 'सोशल नेटवर्किंग' या इलेक्ट्रॉनिक नवमाध्यमांकडे निर्देश करतात. तसे करताना टयुनिशिया, इजिप्त आदी देशांतील अरब स्प्रिंग दरम्यान झालेल्या सोशल नेटवर्किंगच्या परिणामकारक वापराचे उदाहरण देतात. याबाबतीत, बरेचजण (विशेष करून युवा वर्गातील) माझ्याशी सहमत होणार नाहीत, परंतु या संदर्भात आवर्जून सांगावेसे वाटते की, एखादा 'इश्यू तापवण्यापुरता' या माध्यमाचा जरूर उपयोग होऊ शकतो. परंतु, यात जो काही संवाद होतो, तो खूपच वरवरचा आणि उथळ असतो. याद्वारे एखाद्या समस्येबाबतच्या विविध पैलूंबाबत प्रबोधन करणे वा होणे केवळ अशक्य वाटते. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे 'गती' हा या माध्यमामागचा मूलमंत्र आहे. झटपट 'टाईप' करून 'यस्', 'नो', 'सबस्क्राईब', 'सबमिट' या बटणांद्वारे झटपट सहमती साध्य होऊ शकते, परंतु सखोल संवाद साध्य होऊ शकत नाही. त्यामुळेच, याद्वारे वरवरचे मतप्रदर्शन वा भ्रामक मतैक्य होऊ शकते, परंतु त्याला कुठल्याही मतप्रणालीचा वा सैध्दांतिक आधार लाभणे कठीण.याचे दुसरे मूलभूत कारण असे की, आजची मुद्रित वा इलेक्ट्रॉनिक माध्यमे वा सोशल नेटवर्किंगची माध्यमे ही वाचकाला, पाहणाऱ्याला सहभागी होणाऱ्याला एखाद्या विषयाची सर्वांगीण माहिती देऊन चिंतनशीलतेला वाव देणे आवश्यक समजत नाहीत. माहितीचा वा मतांचा मारा इतक्या वेगाने होतो की, त्याचा ऐकणाऱ्याच्या वा वाचणाऱ्याच्या मनावर अत्यंत तात्पुरता परिणाम होतो. तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट ही की, विविध विषयासंबंधीची वा समस्यांसंबंधीच्या माहितीचा परस्पर संबंध दर्शवून देण्याची कोणतीही योजना वा व्यवस्था या तिन्ही माध्यमांमध्ये दिसून येत नाही.