Friday, 1 March 2013

पत्रकारिता आणि कायदा


       पत्रकारिता करणे म्हणजे समाजातील सर्व स्तरांवर सत्तेचा वापर तपासून पाहणे. त्याची शहानिशा करणे. त्यामुळे पत्रकारिता करणारी व्यक्ती ही नेहमीच कोणाला ना कोणाला तरी अडचणीची असणे अपरिहार्य आहे.आणि त्यामुळे पत्रकारितेला कायद्याचे कवच असणे गरजेचे आहे मात्र पत्रकारांनी पण समाजाची सेवा करणे ही आणि ती पण आपले कर्तव्य समजून करणे गरजेचे आहे.
आज अनेकदा पत्रकारांवर हल्ले मोठ्या प्रमाणावर होत आहेत आणि या हल्ल्यांना आळा घालण्यासाठी कायदा हा गरजेचा  आहे. पत्रकारितेच्या विचारसरणीनुसार पत्रकारिता ही केवळ आणि केवळ समाजासाठीच असते.त्यामुळे पत्रकारितेच्या संरक्षणाची महत्त्वाची जबाबदारी समाजावरही पडते. पत्रकारावर हल्ला हा पत्रकारितेवरील हल्ला असे गृहीत धरणेच योग्य आहे; कारण तसे केले नाही तर पत्रकारांना एकटे पाडून त्यांचे कायद्याचे कवच निकामी होण्याची शक्यता आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे  मिड डेचा पत्रकार ज्योतिर्मय डे ऊर्फ जे. डे याच्या हत्येनंतर पत्रकारांना संरक्षण मिळावे हा कायदा करण्यात यावा यासाठी मुंबईसह राज्यभरात पत्रकारांनी आंदोलन सुरू केले. मात्र तेव्हापासुन ते आजपर्यंत त्याच्या मारेकर्याचा शोध अजून लागलेला नाही ही अतिशय गंभीर बाब आहे. कायदा आणि पत्रकारिता या नाण्याच्या दोन समान बाजु आहेत पत्रकार हा समाजाचे प्रतिनिधित्व करतो तर कायदा हा समजतील प्रत्येकाला त्याचा हक्क त्याचा न्याय त्याला मिळवुन देतो आणि यामुळेच समाज हा विकासाकडे वाटचाल करतो आणि यासाठीच या दोन्ही बाजुंनी मिळुन मिसळुन राहणे गरजेचे ठरते
 
मात्र तरीही आज प्रसारमाध्यमे ही आपली जबाबदारी सोडून वागताना दिसत आहेत. पत्रकार हा लोकशाहीचा एक प्रभावी स्तंभ असला तरी त्याचे झपाटयाने होत गेलेले अवमूल्यन समाजापासून लपून राहिलेले नाही. पेड पत्रकारिता, सुपारी पत्रकारिता यातला अतिशयोक्तीचा भाग सोडला तर त्यातले पक्षपाती आणि सहेतुक वार्तांकन सोशली जागरूक व्यक्तीला समजणे कठीण नसते. विशेषतः इलेक्ट्रोनिक मेडियाच्या सवंग बातम्यांचा भडीमार अशा कायदेशीर संरक्षणातून कोणत्या थराला जाईल याची केवळ कल्पनाच करावी. मात्र असे असताना कायदा ही पत्रकारितेला तितकाच धुत्कारतो आहे.एकीकडे कायदा आणि प्रसारमाध्यमे ही परस्पर पुरक दाखवली जातात आणि दुसरीकडे कोर्टावर लिहायचं नाही, त्यातला भ्रष्टाचार चव्हाटय़ावर आणायचा नाही, विधानसभा, कोर्ट रुम्स, खुलेपणानेलाइव्हदाखवायच्या नाहीत, स्टिंग ऑपरेशन्स करायची  नाहीत, ऑडिओ रेकॉर्डिग हे कायद्याच्या लेखी. ठोस पुरावा म्हणून ग्राह्य नाही. अस बोललं जात  मग पत्रकारितेचं होणार काय?असा प्रश्न ही निर्माण होतो आणि पत्रकार हा बेडीत अडकल्या सारखा भासतो. पत्रकारिता ही निर्भयपणेच होणे जास्त गरजेचे आहे तरच समाजात शांतता आणि सुव्यवस्था येऊ शकेल मात्र त्यासाठी कायद्याची बंधने दुर होणे गरजेचे आहे. असे असताना ही पत्रकारांना कायदा म्हणजे काय तो कसा वापरावा त्याचे फायदे काय हे पण माहीत असणे गरजेचे आहे.माध्यमांमध्ये  काम करणार्या पत्रकारांना कायद्याची जाण असली पाहिजे तसेच पत्रकारिता करताना त्याचे भान देखील असले पाहिजे, अन्यथा कायदेशीर बाबींना सामोरे जाण्याची वेळ येवू शकते, हक्कांची भाषा करतांना त्याच वेळी कर्तव्याची देखील जाणीव ठेवणे आवश्यक आहे. दुसर्याचा हक्क म्हणजे माझे कर्तव्य आहे याच भान असावे. प्रामाणिक हेतू ठेवून कायद्याचे बंधन पाळण्याची पत्रकाराने काळजी घ्यावी म्हणजे कायदेशीर बाबींना सामोरे जावे लागणार नाही,प्रत्येक पत्रकाराला कायद्याची मुलभूत माहिती असणे आवश्यक आहे. तरच त्याची पत्रकारिता यशस्वी होवू शकेल. स्वतंत्र भारतातली पत्रकारिता ही रंगाने-ढंगाने पूर्णपणे बदलली. पत्रकारितेचाधर्मही संज्ञा बदलून पत्रकारिताव्यावसायिक  झाली. मात्र हे होत असताना पत्रकार हे  कायद्याचा धाक सोयीस्कर पणे विसरले आणि आपण म्हणजेच सर्वकाही ही वृत्ती त्यांच्यात शिरली मात्र कायदा हा प्रत्येकासाठी सारखाच असतो आणि त्याची नीट अंमलबजावणी होणे गरजेचे आहे असे करण्यासाठी समाजातील प्रतिनिधींनी पुढे येणे गरजेचे आहे आणि प्रसारमाध्यमे ही भुमिका समर्थपणे पेलु शकतात.आज कायदा म्हटला की प्रत्येक सामान्य माणुस यापासुन चार हात दुर पाळतो खर तर कायदा हा त्यांच्याच रक्षणासाठी असतो मात्र त्यांना याचे भय वाटते हीच कायद्याबद्दल ची भीती काढुन टाकुन त्या विषयी आस्था निर्माण करण्याचे काम हे पत्रकारितेने करणे गरजेचे आहे तरच भारतीय जनता शांत आणि सम्रुद्ध जीवन जगु शकेल यात शंका नाही.


 
      

No comments:

Post a Comment